शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल: आजची खुशखबर Age limit relaxed for government jobs: Today’s good news
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने ७५ हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले असून, याकरीता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरीता शिथिल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने भरती प्रक्रीया सुरु झाली आहे.
दरम्यानच्या कालावधीत काही लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. सदर निवेदनांद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की, विविध कारणांमुळे (उदा. कोरोना, सदोष मागणीपत्रे व मागणीपत्र न पाठविणे इ.) पुरेशा जाहिराती प्रसिध्द न झाल्याने, ज्या उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
प्रस्तावनेत नमूद कारणांचा साधकबाधक विचार करुन, या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
कसा असेल शासन निर्णय?
१) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे) देण्यात येत आहे.
२) ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील.
३) सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिध्द झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही, अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील (१) व (२) नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील. त्यानुसार संबंधितजाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी.
४) दि.३१ डिसेंबर, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०३०३१८०२१४६५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आले आहे.
3 thoughts on “शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल: आजची खुशखबर Age limit relaxed for government jobs: Today’s good news”