OLX to Layoff 15 Percent Workforce Globally : जागतिक मंदीच्या (Recession) सावटामुळे जगभरातील दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात (Layoff) करण्यात आली आहे. त्यातच आताच डच कंपनी ओएलएक्स (OLX) कडूनही अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. OLX कंपनी जगभरातील 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यामुळे 1500 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असून त्यांचं भविष्य धोक्यात आहे. ओएलएक्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
OLX 15 टक्के नोकरकपात करणार
ओएलएक्स कंपनी लवकरच 15 टक्के नोकरकपात करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक टेक कंपन्यांनी देशासह जगभरातील अनेक कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे. त्यातच आता OLX कंपनीने देखील जाहीर केले आहे की, ते त्यांच्या जगभरातील कर्मचार्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहेत. कंपनीने यामागे मागणी आणि नफा कमी झाल्याचं कारण दिलं आहे.
कर्मचारी कमी करण्यामागे ‘हे’ आहे कारण
OLX कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘ओएलएक्स कंपनी जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत 15 टक्के कपात करणार आहे. यामुळे सर्व देशांतील कर्मचारी, व्यावसायिक युनिट्स आणि कामावर परिणाम होईल. बदलत्या स्थूल आर्थिक परिस्थितीमुळे कंपनी खर्च कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे. भविष्यातील गरज आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
भारतात इंजिनीअरींग आणि ऑपरेशनल टीमला धोका
कंपनीच्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितले की, ‘आम्ही आमच्या कर्मचार्यांची संख्या कमी करत आहोत ही खेदजनक बाब आहे. कर्मचार्यांनी कंपनीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी आम्ही दिलगीर आहोत. पण, आपल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नोकरकपात करणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांच्या छाटणीमुळे भारतात किती कर्मचार्यांवर परिणाम होईल याबद्दल कोणतीही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. पण, या छाटणीचा सर्वाधिक फटका इंजिनीअरींग आणि ऑपरेशनल टीमला बसण्याची शक्यता आहे.
‘या’ कंपन्यांकडूनही नोकरकपात
OLX आधीही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे. गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲमेझॉन (Amazon), मेटा (Meta), ट्विटर (Twitter), IBM, SAP, स्विगी (Swiggy) या कंपन्यांनीही अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जागतिक मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Source link